1 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
3 आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस,
4 रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या,
5 खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल.
6 त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
7 त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील.
8 त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील.
9 सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
10 जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
11 दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे.
12 वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत.
13 भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल.
14 त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल.
15 जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील
16 त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
17 पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही.
18 लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील.
19 त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत.
20 पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल.
21 दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”