1 Timóteo 2

MARC

1 तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

2 अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.

3 असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो.

4 कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे:

5 कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे.

6 त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय.

7 आणि या उद्देशाने त्यांनी मला या साक्षीसाठी घोषणा करणारा आणि प्रेषित म्हणून नियुक्त केले—मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही—आणि गैरयहूदीयांचा विश्वासू आणि खरा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.

8 म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.

9 स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,

10 तर जे परमेश्वराची भक्ती करणार्‍यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.

11 स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने शिकावे.

12 स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे.

13 कारण आदाम प्रथम घडविला गेला आणि नंतर हव्वा.

14 आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली.

15 म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल.

Ler em outra tradução

Comparar lado a lado